मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. एक रिक्षाचालक असणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केले. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टिकास्त्र सोडले होते; पण आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा करत मास्टरस्ट्रोक खेळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.

संपूर्ण ठाकरे सरकारला वेठीस धरणारे एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचे काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केले.

शिंदे हे सातारा जिल्ह्यातील अहिर (ता. महाबळेश्वर) गावचे रहिवासी आहेत. सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचे ठरवले आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे या दोन व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामे करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रती विश्वास वाढू लागला. कालांतराने एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. पक्षाप्रतीची निष्ठा पाहून एकनाथ खडसेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच. ठाण्याच्या किसन नगरचे शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आले. एकनाथ शिंदे (५८) यांचे बालपण गरिबीत गेले. ते १६ वर्षांचे असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बराच काळ ऑटो रिक्षाही चालवली.

१९९७ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. २००१ मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि २००४ पर्यंत ते या पदावर राहिले. २००४ मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. एकनाथ शिंदे यांची २००५ साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. २०१४ च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते २००४, २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे.