कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी झालेल्यांबाबत विभाग प्रमुखांनी आढावा घ्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात कोरोना लसीकरण मोहीम जिल्हा कृती दल समितीची बैठक झाली.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस प्रमुख तिरूपती काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई म्हणाले, जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान ग्रामीण भागात उद्दिष्टाच्या ४० टक्के, शहरी भागात ४९ टक्के लसीकरण झाले आहे. सद्या जिल्ह्यामध्ये कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीनगर उपजिल्हा रूग्णालय, मुरगूड ग्रामीण रूग्णालय आणि हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा चार नव्याने वाढवून ग्रामीण भागासाठी १७ आणि शहरी भागासाठी ८ अशी एकूण २५ सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. आजअखेर ६९ हजार ८० लस प्राप्त झाल्या आहेत. ३८ हजार ८० लसींचे वितरण केंद्रांना करण्यात आले असून ३१ हजार लसींचा साठा आहे.