संदीप माळवी यांची प्रकट मुलाखत व नागरी सत्कार

0
41

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेले पन्हाळा तालुक्यातील वाळोली गावचे सुपुत्र संदीप माळवी यांची ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपती नियुक्ती झाली आहे. पत्रकार, जनसंपर्क अधिकारी ते अतिरिक्त आयुक्त हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवणारी प्रकट मुलाखत व नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘अमृतवेल फाऊंडेशन’च्या तपपूर्तीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम शनिवार, दि. २१ मे २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे होत आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती प्रमुख पाहुणे म्हणून, तर माजी खासदार राजू शेट्टी अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

अतिशय खडतर परिस्थितीत बालपण आणि परिस्थितीवर जिद्दीने मात करीत शिक्षण पूर्ण केलेल्या माळवी यांनी पत्रकारिता पदवी परिक्षेत सुवर्णपदक मिळवले होते. पत्रकारितेत करिअर करतानाच ते शासकीय सेवेत जनसंपर्क अधिकारी म्हणून दाखल झाले. राज्य एड्स नियंत्रण संस्थेत साडेचार वर्षे काम केल्यानंतर ते ठाणे महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाले. तिथे कर्तृत्व सिद्ध करीत ते उपायुक्त झाले. उपायुक्त म्हणून विविध विभागात धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर अतिशय प्रतिष्ठित आणि निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची पदोन्नती झाली आहे.

हा प्रवास जितका संघर्षपूर्ण तितकाच प्रेरणादायी आहे. हा प्रवास ’अमृतवेल संवाद’ या मालिकेच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. या कार्यक्रमात माळवी यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार असून पत्रकार गुरूबाळ माळी, डॉ. सुनील पाटील, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे आणि धर्मेंद्र पवार हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच उत्तुंग भरारी घेतलेल्या कोल्हापूरच्या सुपुत्राचा नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. या अनोख्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक व अमृतवेल फाऊंडेशनचे अध्यक्ष धर्मेंद्र पवार यांनी केले आहे.