इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिकेच्या निवृत्त झालेल्या १७२ कर्मचाऱ्यांना त्यांची देय असलेली रक्कम तातडीने अदा करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार ७ कोटी ४ लाख ९० हजार ७९९ इतकी रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी आज (शनिवार) रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

नगरपालिकेतून २०१९ पासून १७२ कर्मचारी निवृत्त झाले आहेत या कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम तातडीने मिळावी यासाठी नगरपरिषद कर्मचारी संघटना सातत्याने आंदोलनाची हाक देत होती तर काही कर्मचाऱ्यांनी पालिकेकडून देय असलेली रक्कम न मिळाल्यास आत्मदहन करू असा इशारा दिला होता. लंगोटे नामक एका निवृत्त कर्मचाऱ्याने दोन दिवसांपूर्वी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न पालिका कार्यालयात केला होता. यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणे तातडीने भागवावे असा तगादा मुख्याधिकारी यांच्याकडे लावला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीस अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांना मंजूर केलेली रक्कम आठ दिवसाच्या आत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी लागेल असा आदेशही दिला आहे, अशी माहितीही पोवार यांनी दिली.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, शिवसेना नगरसेवक रविंद्र माने, आरोग्य सभपती संजय केंगार, नगरसेवक राहुल खंजिरे, कामगार नेते उपस्थित होते.