राज्यात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम 

0
151

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने  ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील केले होते. पण याबाबतचे गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील.  या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.  तर याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणाणे सुरु राहतील,  असे सरकारने आज (बुधवार) स्पष्ट केले.

राज्य सरकारने काही निर्बंध शिथील केले असले, तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी दिलेली नाही. मुंबई लोकल लवकरच सुरु होण्याचे संकेत मिळत असले तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच राज्य सरकारने  ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारकडून अधिकृत  जारी केलेल्या आदेशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे.  राज्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ आणि बळींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.  परंतु आणखी खबरदारी घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.