कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील आठवड्यापासून म्हणजे ५ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा सध्या ४ थ्या गटात आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचल्याने पुढील आठवड्यातही निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना लॉकडाउनमधून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे.

दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज (शुक्रवार) राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून १४ जूनपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यात कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. कोल्हापूरनंतर (१५.८५ टक्के) रत्नागिरी (१४.१२), रायगड (१३.३३) यांचा रेट जास्त आहे.  तर गोंदिया जिल्ह्याचा राज्यात सर्वाधिक कमी म्हणजे ०.८३ पॉझिटिव्हिटी रेट आहे.

जिल्ह्यांमधील ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार सर्वाधिक भरलेले ऑक्सिजन बेड देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. गुरुवारच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ६७.४१ टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. त्यापाठोपाठ सिंधुदुर्गमध्ये ५१.५९ टक्के बेड, रत्नागिरीमध्ये ४८.७५ टक्के तर साताऱ्यामध्ये ४१.०६ टक्के बेड भरलेले आहेत.

या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगरपालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल. पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणेच ऑक्सिजन बेड किती प्रमाणात भरलेले आहेत, त्यानुसार देखील जिल्ह्यांची वर्गवारी कोणत्या टप्प्यात करायची किंवा कोणते निर्बंध जिल्ह्यात लागू करायचे, याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. वरील परिस्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यात १४ जूनपासून निर्बंध कमी होण्याची शक्यता कमी होण्याची शक्यता आहे.