…तर आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा : काँग्रेस नेता

0
213

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्यास आणि त्याचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत, असे ट्विट करत काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाच्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांचाही उल्लेख आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली होती. मात्र, त्यांना याबाबत आधीपासूनच या सगळ्याची कल्पना असल्याचे परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यात  मोठी खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी या प्रकरणावर रान तापविण्यास सुरूवात केली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून भाजपने ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.