शहीद संग्राम पाटील यांच्या बलिदानाचा सन्मान हृदयात रहावा : नारायण अंकुशे

0
16

निगवे खालसा (प्रतिनिधी) : निगवे खालसा गावचा सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. त्यामुळे त्यांच्या बलिदानाचा सन्मान सदैव ग्रामस्थांच्या हृदयात राहिला पाहिजे. सैनिकांच्या त्यागामुळे आज आम्ही सुरक्षित आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे यांनी केले. शहीद संग्राम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा सैनिक वेलफेअर असोसिएशन जिल्हाअध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे, सचिव बी. जी. पाटील, १६ बटालियनचे सुभेदार मेजर बाळू तांबे, पुणे, अध्यक्ष बाबासाहेब जाधव, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष महादजी पाटील, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, नायक सुभेदार राहुल सावंत आदीसह वीरपिता शिवाजी पाटील, वीरमाता सावित्री पाटील, वीरपत्नी हेमलता पाटील, वीरबंधू संदीप  पाटील, वीरपुत्र शौर्य, वीरकन्या शिवश्री उपस्थित होते.

यावेळी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दांडपट्टा, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शहीद जवानांच्या स्मरणार्थ कँडल मार्च काढण्यात आला. प्रा. डॉ. प्रिती शिंदे यांचे ‘व्यर्थ न हो बलिदान’ या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी आ. ऋतुराज पाटील, बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, संचालक श्रीपती  पाटील, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, प्रतापसिंह पाटील, उदय पाटील, अर्जुन आबिटकर, सागर पाटील, शहाजी चौगले, दताजीराव उगले, जगदीश पाटील आदींनी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले.

जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांनी स्वागत केले. तर पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी मुख्याध्यापक डी. एस. ढगे यांनी आभार मानले.