मुंबई महापालिका धर्तीवर ‘दक्षिण’मध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प : ऋतुराज पाटील

0
274

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या धर्तीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर महानगरपालिकेच्या मदतीने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा आपला संकल्प असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

ऋतुराज पाटील यांनी आ. जयंत आसगावकर यांच्यासोबत गुरुवारी दादर पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलला भेट दिली. महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या या शाळेत डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, सीसीटीव्ही सुविधा ठिकाणी उपलब्ध आहेत.

नर्सरी ते सातवी पर्यंत शिक्षण सध्या येथे उपलब्ध असून ४८० इतकी विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबर शालेय साहित्यही याठिकाणी मोफत दिले जाते. अशाप्रकारच्या ११ शाळा बृहन्मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत. याच धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सीबीएसई पॅटर्न शाळा सुरू करण्याचा आपला संकल्प असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

यावेळी सौ. पूजा ऋतुराज पाटील, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ,  शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, विस्तार अधिकारी स्नेहलता डुंबरे, शिक्षक शिवाजी बर्डे आदी उपस्थित होते.