नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी झालेल्या राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी आहे, असे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाराजी व्यक्त केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (शुक्रवार) सुरूवात झाली. अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषण करताना राष्ट्रपतींनी अनेक विषयांवर भाष्य केले.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कोरोना आणि इतर संकट काळात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतूक करून सरकारने योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे पारीत करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटीपेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना तत्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.