मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेले वृत्त  पूर्णपणे चुकीचे व तथ्यहीन असल्याचे राज्यपालांच्या जवळील सूत्रांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी काही माध्यमांवर झळकले होते.

सूत्रांनी सांगितले की, राज्यपाल पदमुक्त होण्याचे संकेत आहेत, अशा बातम्या जाणूनबुजून खोडसाळपणे प्रकाशित केल्या जात आहेत. राज्यपालांनी पदमुक्त होण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भगतसिंह कोश्यारी वादात सापडले आहेत. राज्यभरात त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्व विरोधी पक्षांसह अनेक संघटनांनीही केली आहे. मात्र, राज्यपालांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

पदमुक्तीच्या संकेताची चर्चा तथ्यहीन

अशातच राज्यपाल पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर झळकल्या. या बातम्यांनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही निकटवर्तीयांकडे पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत राज्यपालांच्या जवळच्या सूत्रांनी हे वृत्तच तथ्यहीन असल्याचे म्हटले. राज्यपालांबाबत जाणूनबुजून अशा खोट्या बातम्या प्रसारीत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.