शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील १ हजार पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबतचा चुकीचा अहवाल शिरोळ तहसीलदार यांनी इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केला आहे. तरी हा अहवाल दुरूस्त करून पुन्हा सुधारित अहवाल पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात याव्यात, अशी मागणी शिरोळ तालुका पूरगस्त सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूरग्रस्त १ हजार  नागरिकांची  निवाऱ्याची सोय करण्यात यावी. यासाठी कायमस्वरूपी भूखंड  देण्याची मागणी पूरग्रस्त सेवा संस्थेने ९ जुलै २०२० रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे  केली होती.  त्यानुसार स्थानिक चौकशी करून अहवाल शासन तरतूद व शासन निर्णय नमूद करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत अहवाल सादर करणेबाबत आदेश दिला होता. हा आदेश मिळाल्यानंतर  शिरोळ तहसीलदार यांनी स्थानिक चौकशी न करता किंवा मंडल अधिकारी यांचा कोणताही अहवाल न घेता  आणि शासनाची जमीन शिल्लक असल्याबाबत कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या पद्धतीचा अहवाल दिला आहे.

सध्या राहत असलेले ठिकाण हे शासनाकडून पूरगस्त भाग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी पुराचे पाणी येते. त्यामुळे या लोकांचे पुनर्वसन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी भूखंडाची मागणी केली आहे. याबाबत सुधारीत अहवाल देण्याचे  निर्देश तहसीलदार यांना देण्यात यावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.