कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका ओपनस्पेसमध्ये केलेले अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामाबाबतची माहिती नागरिकांनी ईमेल अथवा व्हॉटस्अपवर करावी. असे आवाहन पालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज (शुक्रवार) केले आहे.

डॉ. बलकवडे म्हणाल्या की, महानगरपालिका क्षेत्रामध्ये रेखांकन मंजूरीचे वेळी शहरात विविध ठिकठिकाणी ओपनस्पेस, खुली जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. या रेखांकनामध्ये ठेवण्यात आलेल्या ज्या ओपनस्पेसना महानगरपालिकेचे नाव नोंद नाही त्याबाबत महानगरपालिकेच्या नाव नोंदणीची कार्यवाही महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेली आहे. या ओपनस्पेसच्या जागा खुल्या असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेचे ओपनस्पेस संबंधीतांकडून नागरीकांच्याकडून खुली ठेवण्याचे आहेत. त्यावर कोणतेही अतिक्रमण अथवा अनाधिकृत बांधकाम करण्यात येणार नाही. याबाबत वारंवार महापालिकेच्यावतीने सूचीत करण्यात आलेले आहे.

परंतु, काही नागरीक या ओपनस्पेसमध्ये अतिक्रमण करुन अनाधिकृत बांधकाम करीत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, शहरातील महानगरपालिकेमार्फत ठेवण्यात आलेले ओपनस्पेस, खुल्या जागेवर कोणतेही अतिक्रमण अथवा अनाधिकृत बांधकाम करित असल्यास अथवा केले असलेचे निदर्शनास आल्यास,  adtpkmc@gmail.com या ई मेल अथवा  9158535320 या मोबाईल नंबरवरच्या व्हॉट्सअपवर ओपनस्पेसमधील अतिक्रमण अथवा अनाधिकृत बांधकामाची तक्रार, माहिती द्यावी.

तसेच महानगरपालिकेचे नांव लावण्याचे अनुषंगाने काही माहिती असलेस ती माहितीसुध्दा ई मेल अथवा व्हॉट्सअप नंबरवर देण्यात यावी. शहरातील ओपनस्पेसची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.