टोप (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज दुपारी कोल्हापूर महामार्ग बंद झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिरोली येथे सांगली फाटा ते पंचगंगा पूल या दरम्यान महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे.

आज सकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत सांगली फाटा येथील दोन्ही सेवा रस्त्यावर पुराचे पाणी आले होते.  हा रस्ता त्यामुळे वाहतुकीस बंद करण्यात आला. दरम्यान आज दुपारी पुराच्या पाणी राष्ट्रीय महामार्गावर देखील आले. अजूनही पावसाचे प्रमाण खूप आहे त्यामुळे ही पाणीपातळी आणखी वाढू शकते. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी २०१९ ला मुसळधार पावसाने हाहाकार घातल्याने जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने जन जीवन विस्कळीत होऊन लाखांचे नुकसान झाले होते. यामध्ये पुराच्या पाण्यात येथे असणाऱ्या फर्निचर शोरूम पाण्यासोबत वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण, आज या स्थितीचा विचार केला की या फर्निचर शोरूमचे मालक मात्र गाफील राहून पुराचे पाणी शोरूममध्ये  येण्याची  वाट पाहत असल्याचे बोलके चित्र दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी हेच शोरूम पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. तरीपण या शोरूम  मालकास मागील नुकासानीची जाणीव नसल्याचे दिसत आहे.