नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गुजरातमधील सुरत जिल्हा न्यायालयाने चार वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी याही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. जवळपास पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या टिप्पणीवरून रेणुका चौधरी हे पाऊल उचलणार आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी या, पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला शूर्पणखा म्हटल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
2018 मध्ये राज्यसभेत केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी आपल्या हसण्यावरून टोला लगावला होता आणि आपल्या हास्याची तुलना अप्रत्यक्षपणे रामायणातील पात्र शूर्पणखेशी केली होती, असा दावा रेणुका चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे आता रेणुका चौधरी यांनीही पंतप्रधानांवर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता, या ‘दर्जाहीन’ अहंकारी व्यक्तीने सभागृहात आपल्याला शूर्पणखा असे संबोधले होते. याबद्दल आपण मानहानीचा खटला दाखल करणार आहे.