पुणे (प्रतिनिधी) : विख्यात आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. आज (मंगळवार) दुपारी त्यांनी पुण्यातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. हयातभर आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केलेल्या तांबे यांना राज्यातील नागरिकांनीच प्रेमाने आणि आदराने ‘आयुर्वेदाचार्य’ ही उपाधी बहाल केली होती. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

तांबे यांचे आयुर्वेद आणि योग शिक्षणामध्ये कार्य मोठे आहे. त्यांनी शास्त्रशुद्ध आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. समाजात आयुर्वेदाबाबत आस्था, रुची निर्माण करण्यात आणि वाढविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. परदेशी नागरिकांनाही त्यांनी आयुर्वेद उपचाराचे महत्त्व पटवून दिले.

मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, सुनील आणि संजय हे सुपुत्र,  सुना, नातवंडे असा परिवार आहे.