नामांतरावरून पुन्हा काँग्रेसला डिवचले ; मंत्री वडेट्टीवारांनी शिवसेनेला सुनावले  

0
97

मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिव म्हणा किंवा संभाजीनगर,  जोपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही निर्णय होत नाही, तोवर त्याला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतरणाला विरोध आहे. महाविकास आघाडी सरकार आणताना किमान समान कार्यक्रम आखण्यात आला, त्यामध्ये कुठेही नामांतरणाचा भाग नाही, असे स्पष्ट करत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय खात्याबाबत निर्णय घेण्यात आला.  धाराशिव-उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला सलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे, यात उस्मानाबादचा धाराशिव उल्लेख करण्यात आला आहे. यावरून  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  सुनावले आहे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे,  असे काँग्रेसने शिवसेनेला ठणकावून सांगितले  आहे.