मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वृद्धाची असहाय्य वेदनेतून सुटका

0
59

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उपचाराविना पायाच्या दुखापतीमुळे गेल्या महिन्याभरापासून तावडे हॉटेल परिसरात दयनीय अवस्थेत पडून असलेल्या वृद्धाला मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरु केल्याने त्या वृद्धाची असहाय्य वेदनेतून सुटका झाली आहे.       

तानाजी शामराव जगताप (वय ६५ रा. येवलेवाडी ता.वाळवा जि.सांगली) हा वृद्ध गेली एक महिन्यापासून तावडे हॉटेल येथे पायाच्या दुखापतीमुळे पडून होता. ही बाब गांधीनगर येथील ‘द इंटरनॅशनल ह्यूमन राईट्सच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी वृध्दाची भेट घेऊन विचारपूस केली असता त्यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांची भेट घेऊन त्याबाबत सविस्तर चर्चा केली.

भांडवलकर यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर वृध्दला निगडेवाडी येथील नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालून त्यांची केसदाढी करून नवीन कापडे घालण्यात आले. त्यांच्या पायाच्या उपचारासाठी तावडे हॉटेल येथील डॉ. राहुल बडे यांच्या रुग्णालयात नेऊन उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शिरोली जुना जकात नाका येथील महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.