दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा

0
1450

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय. गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा आता साडेतीन तासांची असणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (शनिवार) शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा एप्रिल अखेरपासून सुरू होणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या परीक्षा ऑनलाइन होणार का अशी चर्चा होती. याबाबत मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले की, परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत, मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटाच्या आधारे विद्यार्थी आणि पालक यांना लोकल मुभा देण्यात येणार आहे. पासिंग गुणांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
बारावी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना पाच प्रयोग शिकवणार आणि त्यावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आणि त्याला परीक्षा देता आली नाही तर जून महिन्यात अशा विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.