अहमदनगर (प्रतिनिधी) : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर न्यायालयाने फेटाळला आहे. बोठे याने ७ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज (बुधवार) सुनावणी झाली.

३० नोव्हेंबर रोजी पुणे-नगर रस्त्यावर जतेगाव घाटात जरे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नगर पोलिसांनी त्वरेने शोधमोहीम राबवून जरे यांच्या मारेकऱ्यांना अटक केली होती. ‘दै. सकाळ’चा नगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली होती. तेव्हापासून बोठे फरारी आहे. पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. मात्र, बोठे याने ७ डिसेंबर रोजी अहमदनगर न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजुरीसाठी अर्ज केला होता.

आज अहमदनगर न्यायालयात यावर सुनावणी झाली. बोठे याला संशयितांनी विनाकारण या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी युक्तिवादात केला. मात्र, न्यायालयाने बोठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे बोठे याला कधीही अटक होऊ शकते.