मुंबई (प्रतिनिधी) : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे कुंभार समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. कुंभार समाजाला गणेश मूर्ती करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेली बंदी शासनाने उठवावी आणि कुंभार समाजास न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

याप्रसंगी झालेल्या बैठकीत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या भावना गणेशोत्सवाशी जोडल्या असून कुंभार समाजावर अन्याय होवू देणार नाही, प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या सोबत लवकरच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही मंत्री शिंदे यांनी शिष्ठमंडळाला दिली.

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, गणेशोत्सव सण म्हणजे कुंभार समाजाचा आर्थिक कणा आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी माती उपलब्ध होत नसल्याने मूर्ती सुबक आणि दर्जेदार बनण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस हेच एक माध्यम आहे. महापूर, कोरोना यामुळे कुंभार बांधव कर्जबाजारी झाले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये केमिकल्स नाहीत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही, असे पुरावे आहेत. हरित लवादानेही हे मान्य केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर झाल्यास नगरविकास विभागाने कारवाई करावी, असा कायदा आहे. त्यामुळे महापालिका व नगरपालिका यांनी कुंभार समाजावर कारवाई करू नये, असे आदेश द्यावेत, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवावी, अशी मागणी केली.

यावेळी कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळामध्ये कोल्हापूर कुंभार समाजाचे माजी महापौर मारुतीराव कातवरे, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, सतीश  बाचणीकर, रवी माजगांवकर, सुनिल माजगांवकर, शिवाजीराव वडणगेकर, पुणे कुंभार समाजाचे प्रवीण बावदणकर, पेण कुंभार समाजाचे अभय म्हात्रे, कैलास पाटील, हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.