कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणचे चेअरमन अनुज अग्रवाल व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नाईट लँडिंग सुविधा, पायलट प्रशिक्षण केंद्र, कार्गो हब उभारणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१३७० मी. लांबीची सध्याची विमानतळ धावपट्टी २३०० मी. करण्यात येणार आहे. त्यासाठी ६४ एकर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी एक विहित कालावधी निश्चित  करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, १९०० मीटरची धावपट्टी कार्यान्वित करण्यासाठी लागणारी विमानतळ ॲप्रोच लाईट, नाईट लँडिंगसाठी लागणारी लाईट्स येत्या दोन महिन्यांमध्ये उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याचसोबत, विमानतळाच्या फनेलमध्ये येणारे सर्व अडथळे मॅपिंग करून त्यापैकी काढता येणारे सर्व अडथळे विहित काळामध्ये काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या सर्व अडथळ्यांचे मार्किंग करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.