मुंबई  (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाने विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दणका बसला आहे. यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून आता फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

इतकचं नाही तर काही मंत्र्याची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याउलट राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती. त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, सुरक्षा कपातीच्या निर्णयावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करताना हे कोत्या मनोवृतीचे लक्ष असल्याचे म्हटले आहे.