इचलकरंजी (प्रतिनिधी) : घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन शिवसेना महिला आघाडीतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी महिलांनी प्रांत ऑफिससमोर चुली पेटवून केंद्र सरकारचा निषेध केला. शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले.

मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेनेच्या नगरसेविका उमाताई गौड यांच्यासह काही महिला डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या महागाईने गगनाला भिडली असून घरगुती गॅस दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांना संसाराचा गाडा चालविणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस दर कमी करून गॅसला मिळणारी सबसिडी पूर्ववत सुरू ठेवावी, महागाईला आळा घालावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. गॅस दर कमी  न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या वेळी देण्यात आला.

मोर्चात शिवसेना महिला आघाडी सौ. मंगलताई चव्हाण, माधुरी ताकारे, मंगल मुसळे, सुवर्णा धनवडे, दिप्ती कोळेकर, रेखा जाधव, शोभा गोरे, उषा चौगुले, शोभा कोलप, आशाराणी उपाध्ये, कार्तिकी चव्हाण, सोनाबाई कुंभार, सविता सपाटे, अक्काताई कोळी आदी महिला सहभागी झाल्या होत्या.