दलित तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी डिक्की-शाहू समूहामध्ये सामंजस्य करार

0
3

कागल (प्रतिनिधी) :  राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव कार्य केले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालविण्यासाठी दलित समाजातील तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि शाहू समूह यांच्यामध्ये  सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कागलमध्ये   व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले  की, डिक्कीचे संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे स्वतः या कार्यशाळेत  मार्गदर्शन करणार आहेत. बहुजन समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी शाहू समूह आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यामध्ये सामंजस्य करार नुकताच पूर्ण झाला आहे. आता येथून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्रितपणे काम केले जाणार आहे.

स्टॅन्ड अप इंडियाचा लाभ तरुणांना देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनामार्फत युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टॅन्ड अप इंडिया अंतर्गत कौशल्य विकासावर आधारित विविध कोर्सेस व अनुदानाच्या योजना सुरू केल्या आहेत. याची अधिक माहिती मी वेळोवेळी केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधून घेत आहे. आधुनिक शेती, डेअरी व संलग्नित उद्योगात तरुणांना पुढे आणण्यासाठी व केंद्र शासनाच्या अनेक योजना, विविध व्यवसाय संधी यांची माहिती देऊन त्याबाबतचे मार्गदर्शनही आम्ही करणार आहोत, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.