दिलासादायक : देशभरात सहा महिन्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत घट  

0
79

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनावरील लसीकरणाला लवकरच सुरू होत असताना देशातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांसह आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर देशात मागील २४ तासांत २० हजारांपेक्षाही कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत १८ हजार ७३२ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० इतकी झाली आहे. तसेच देशात २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ४७ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ७८ हजार ६९० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जण कोरोनामुक्त झाले  आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात २१ हजार ४३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात २ हजार ८५४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. ६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ हजार ५२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख १६ हजार २३६ वर पोहचली आहे. रिकव्हरी रेट ९४.३४ टक्के इतका झाला आहे.