कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेले तीन दिवस सलग पावसामुळे कोल्हापूरवर पुराचे भयंकर संकट आले आहे. दरम्यान रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने पाणीपातळी १ फुटाणे घटली आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तर पाणीपातळी वेगाने उतरण्यास मदतच होणार आहे. आज सकाळी सूर्यदर्शन झाल्याने कोल्हापूरकर थोडसे सुखावले आहेत.

शनिवारी सकाळी सहा वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी ५६ फूट होती. सकाळी सात वाजता हीच पाणीपातळी ५५. १० फुटांवर आली आहे. राधानगरी धरण ९६ टक्के भरले आहे. पाणी ओसरण्याचा वेग जास्त असल्याने महापुराचे पाणी कमी होऊ शकते. राधानगरी धरणाचे दरवाजे अद्याप उघडले नसले तरी ते केव्हाही उघडू शकतात. त्यामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या शहरात टायटन शोरूम ते कोंडाओळ रस्ता, शहर वाहतूक कार्यालय, शहाजी कॉलेज, करवीर पंचायत समिती, शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, कुंभारवाडा, गवत मंडई, जाधववाडी, कदमवाडी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महावीर कॉलेज परिसर,रमणमळा, न्यू पॅलेस परिसर पूर्णपणे पाण्याखाली आहे.

वातावरण असेच राहिल्यास एक दिवसात पाणी बऱ्याच अंशी उतरू शकते. महापुराचा विळखा असल्याने महामार्ग बंद आहे. परिणामी पुणे, मुंबईकडे जाणारे सर्व नागरिक कोल्हापुरात अडकले आहेत. शुक्रवारी पन्हाळ्यावरील रस्ता खचला होता. शनिवारी रात्री सादळे मादळे येथील रस्ता खचला असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.