गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असुन तालुक्यात केवळ २० रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. तालुक्याच्या दृष्टिने ही दिलासादायक बातमी आहे. तालुक्यातील केवळ ९ गावात कोरोनाचे २० रूग्ण असुन ८८ गावात कोरानाचा एकही रूग्ण नाही.

पहिल्या लाटेत बहुतांशी गावात कोरोनाचा फारसा संसर्ग झालेला नव्हता. दुसर्‍या लाटेत मात्र या गावामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला गेला. मृतांच्या संख्येतही वाढ झाली. एप्रील, मे, जुन महिन्यात तर रूग्णसंख्येने कळस केला होता. गारगोटी शहरामध्ये सुमारे शंभरहून अधिक अ‍ॅक्टीव्ह रूग्ण होते. तर गारगोटी कोवीड सेंटरमध्ये दोनशेहून अधिक रूग्ण उपचार घेत होते. दुसर्‍या लाटेत दुपटीहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह झाले. तर, मृतांची संख्याही दुप्पट झाली. त्यामुळे प्रशासनही हादरून गेले होते.

आरोग्य विभागासह प्रशासनाने गावनिहाय कोरोना चाचण्यावर मोठा भर देऊन कॉन्टॅक्ट ट्रेसींग केले. प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार अश्‍विनी अडसुळ, गटविकास अधिकारी श्रीमती एस. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. एत्नाळकर यांनी गावा-गावात जाऊन नागरीकांना कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी आवाहन केले. यासाठी महुसल, ग्रामसेवक व आरोग्य यंत्रणाही कामाला लावली तर कोवीड सेंटरमध्ये डॉ. मिलींद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रूग्णावर उपचार करण्यात आले. तालुक्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अमलबजावणीही केली.

तालुक्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल

२६ जुलै रोजी गडबिद्री येथे ६८ नागरीकांची कोरोनाची चाचणी केली एकही रूग्ण आढळून आला नाही. याच दिवशी गारगोटीतील ३ हजार ३ रूग्णांची चाचणी केली यामध्ये केवळ २ रूग्ण आढळून आले. निळपण येथे २ ऑगष्ट रोजी ३९८ जणामध्ये केवळ १ चाचणी पॉझिटिव्ह आली. ३ व ४ ऑगष्ट रोजी पिंपळगावमध्ये घेतलेल्या ६२५ मध्ये एकही रूग्ण आढळून आला नाही. ५ ऑगष्ट रोजी कलनाकवाडी येथे २६२, तर ६ ऑगष्ट रोजी म्हसवे येथे ५४१ जणांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले. या आठवडाभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असुन भुदरगड तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

दुसर्‍या लाटेत दुप्पट रूग्ण…

पहिल्या लाटेत १ हजार २७७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यापैकी १ हजार ३३ नागरीकावर उपचार करण्यात आले. तर ४० जणांचा मृत्यु झाला. दुसर्‍या लाटेत ३ हजार ८९३ पॉझिटिव्ह आढळून आले असुन  ३ हजार ७८७ जण उपचार घेऊन घरी परतले तर ८४ जणांचा मृत्यु झाला.