कोतोली (प्रतिनिधी) : उपेक्षित जीणं सत्तर वर्ष जगणाऱ्या रामाच्या आयुष्याची पहाट अखेर उगवली. निमित्त झाले ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे. जि.प. सदस्य शंकर पाटील यांच्या पुढाकाराने कोतोलीतील गुरे राखणारा रामचंद्र महादेव शेटे म्हणजेच ‘रामा’ च्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात ध्वजारोहण करण्यात आले. रामाला ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याने सर्वांचीच मान अभिमानाने उंचावली.     

गेली साठ वर्ष केवळ गावची गुरे राखत उपेक्षित जीवन जगणारा रामा तसा दुर्लक्षित राहिला. गेल्या साठ वर्षांत रामाने गावची गुरे घेऊन सकाळी गावाबाहेर पडायचे आणि संध्याकाळी घेऊन परत यायचे, हे काम अगदी इमाने इतबारे त्यांने केले. याबदल्यात महिन्यांकाठी लोकांकडून काही मिळेल, ते घ्यायचे, मिळेल ते खायचे आणि समाधानाने जगायचे, हेच त्यांच्या जगण्याचे सूत्र.

अनेक वर्षात मानसन्मानाच्या गर्दीत रामाच्या वाट्याला खरा सन्मान आलाच नाही आणि त्याला ही याची खंत वाटली नाही. परंतु ज्याने आयुष्यभर निर्मळ मनाने गुरांची सेवा केली. त्या रामाला शंकर पाटील यांनी ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याने सर्वांची मान आपसूकच उंचावली.

याआधीही रामाच्या हस्ते दूध संस्थांचे उद्‌घाटन करून त्याच्या कामाचा सन्मान  शंकर पाटील यांनी केला होता. आताही त्याच्या हस्ते ध्वजारोहण केल्याने पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी डॉ. कुणाल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सतीश सर्वगोडे, महादेव पाटील, आरोग्य सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.