‘रयत’तर्फे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार…

0
97

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील लढत आता सर्वच उमेदवारांच्या जोरदार प्रचाराने रंगतदार होऊ लागली आहे. प्रा. आसगावकर, अरुण लाड या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करेल, असा निर्धार आज झालेल्या बैठकीत करण्यात आला.

महाविकास आघाडीतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर निवडणूक लढवित आहेत. ‘रयत’ ही राज्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेतील सुमारे साडेचार ते सहा हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. ही एकगठ्ठा मते नेहमीच निर्णायक ठरतात. त्यामुळे ‘रयत’चा पाठिंबा या निवडणुकीत महत्वाचा मानला जातो. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, माजी सचिव, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य संघटनेचे डॉ. बी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, दिलीप कुरळपकर, राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रा. शिवाजी कोरवी, श्रीकांत पाटील उपस्थित होते.

तसेच अरूण लाड आणि प्रा. आसगांवकर यांनी निवडणुकीसंदर्भात डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ‘रयत’तर्फे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. सर्व रयत सेवक महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निश्चित निवडून आणतील, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.