कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी गोकुळ संघाच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहेच. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव मी या निवडणुकीमध्ये उतरणार नसल्याची चर्चा जाणीवपूर्वक विरोधक करत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

आपटे यांनी आज (गुरुवार) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मतदारांना तर आवाहन केलेच, त्याचबरोबर विरोधकांवरही निशाणा साधला. त्यांनी पत्रकात म्हटले की, मी ‘गोकुळ’मध्ये केलेल्या कामाबाबत काहीच बोलता येत नसल्याने आता विरोधक मी तब्येतीमुळे निवडणूक लढविणार नसल्याच्या अफवा पसरवत आहेत.. अनेक ठिकाणी दूध संस्था ठरावधारकांनी आम्हांला रविंद्र आपटे यांचे गेल्या ३५ वर्षात मोठे सहकार्य मिळाले असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी भूमिका मांडली. त्या वेळी, ते आता निवडणूक लढवणार नाहीत अशी चुकीची माहिती विरोधक देत आहेत. परंतु माझी तब्येत सुधारली आहे. गेल्या महिन्यापासून मी गोकुळच्या बैठकांना आणि नियमित कामकाजातही सहभागी झालो आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर दूध उत्पादक आणि संस्था ठरावधारक यांनी विश्वास ठेवू नये.