नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि आर श्रीधर यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

शास्त्री यांची ४ सप्टेंबररोजी कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, भरत अरुण आणि श्रीधर हे दोघे शास्त्री यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना  क्वारंटाइन केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त, इतर चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना देखील वेगळे केले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी सर्व खेळाडूंची दोनदा चाचणीही घेण्यात आली, चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना खेळण्याची परवानगी देण्यात आली.