गारगोटी (प्रतिनिधी) :  मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ आरक्षणासाठी भुदरगड तालुक्यात मागील १५ दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे.  आज (सोमवार) भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गारगोटी-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे २ तास वाहतूक खोळंबली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भुदरगड तालुका सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यासाठी सकाळी १० वाजल्यापासूनच तालुक्यातून आंदोलक एस टी स्टँड परिसरात जमा होत होते. आंदोलक मोठ्या संख्येने जमल्यानंतर त्यांनी गारगोटी कोल्हापूर मार्गावर ठिय्या मारला. रस्ता अडवून धरल्याने दोन्ही बाजूनी वाहतूक खोळंबली, कोल्हापूरच्या बाजूने आणि गारगोटी शहराच्या बाजूने सुमारे ४ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकाकडून “एक मराठा-लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

यावेळी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाचे समन्वयक आनंद चव्हाण यांनी आरक्षणाची भूमिका मांडली. सचिन भांदिगरे, मचिंद्र मुगडे, किरण किशोर आबिटकर, डॉ. राजीव चव्हाण, यांची भाषणे झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्य शासनाने नोकर भरती करू नये, कायमस्वरूपी आणि टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने ठोस प्रयत्न करावेत, सारथी संस्थेसाठी १ हजार कोटींचा निधी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांना आंदोलनस्थळी हे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, राहुल देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, सत्यजित जाधव, गारगोटी सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच स्नेहल कोटकर, प्रविणसिह सावंत, विश्वनाथ कुंभार, माजी सभापती बाबा नांदेकर, किशोर आबिटकर, शिवसेनेचे प्रकाश पाटील, अविनाश शिंदे, यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.