कोल्हापुरातील ‘त्या’ आमदारावर भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांनी आणला होता दबाव : आव्हाडांचा गौप्यस्फोट

0
112

मुंबई (प्रतिनिधी) : शिरोळचे अपक्ष आमदार व राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर राहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (गुरुवारी) दुपारी ट्वीट करून केला आहे. 

रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमधून राज्यातील पोलीस बदली रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आज पत्रकार परिषद घेऊन मंत्री आव्हाड यांनी गंभीर दावे केले आहेत.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगच्या पत्राबद्दल कळल्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कारवाई करू नये, अशी मागणी करत रडल्या. रश्मी शुक्ला पाया पडताना म्हणाल्या होत्या की, ‘मै माफी मांगती हूँ, मेरा लेटर वापस दे दो, असा दावाही आव्हाड यांनी केला आहे.

सर्व चुका करून जर रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा, माझे पती नुकतेच वारले आहेत, असे त्या म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आलं नाही, असा देखील दावा आव्हाड यांनी यावेळी केला.