राशिवडे (प्रतिनिधी) :  होळीत पडणारी पोळी  एखाद्या गरजू,  भुकेल्याच्या मुखास लागावी. तसेच निराधार, गोरगरीब लोकांना सणाचा आस्वाद मिळावा, या हेतूने गावातील अनेक तरुण मंडळांच्या माध्यमातून पोळ्या जमा करण्याचे आवाहन शिवबा प्रतिष्ठानने केले होते. त्यास राशिवडेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जमा झालेल्या पोळ्या कोल्हापूर येथील निराधार आणि वृद्ध लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘एकटी’ या संस्थेसाठी,  एचआयव्ही  बधितांसाठी कार्यरत असलेल्या ‘जाणीव’ या संस्थेस आणि बालकांसाठी कार्यरत असलेल्या ‘अवनी’ संस्थेस देण्यात आल्या.

होलीपूजन झाल्यावर आहुती म्हणून पोळी टाकण्यापेक्षा एखाद्याला खाऊ घालणं चांगलं, या भावनेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत राशिवडेतील नवशा गणपती, राजे गणपती, बिरदेव गणपती,  सावकार गणपती,  शिवनेरी, पेठेचा राजा, संत गोरोबा कुंभार,  आप्पाशास्त्री तरुण मंडळ,  डॅश बॉईज आदी मंडळातील कार्यकर्ते या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले.  हा उपक्रम राबवण्यासाठी महेश शिरगावे, रुपेश सरनाईक, प्रसाद कावणेकर, अरुण लाड,  अथर्व परीट, सुजल पोवार,  गणेश डकरे, अनिकेत गिरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.