प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दुर्मीळ तरीही आशादायक चित्र..!

0
234

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजच्या काळात दिवसेंदिवस प्रामाणिकपणा संपल्याची सार्वत्रिक ओरड होत असते. पैशाच्या बाबतीत तर लोभीपणा वाढतो आहे. पण, अशा काळातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याची दुर्मीळ का होईना काही उदाहरणे आशादायक ठरतात. सारेच काही संपले, हे खरे नाही, हे दाखवून देणारी अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. ‘एमएसईबी’चे लिपिक राहुल गजानन कोळी यांनी हरवलेले पैशाचे व महत्त्वाच्या कागदपत्रांचे पाकीट परत करत अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले.

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लाईव्ह मराठी’चे निवासी संपादक सरदार करले यांनी जरगनगर येथील भाजी विक्रेत्या आजीकडून भाजी खरेदी केली. पैसे भागवून ते गडबडीने घरी आले. थोड्यावेळाने पैशाचे पाकीट खिशात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाकिटात मोठी रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असल्याने त्यांनी भाजी विक्रेत्या आजीकडे जाऊन चौकशी केली. पण, काहीच सापडले नाही.

भाजी खरेदीसाठी आलेल्या राहुल कोळी ( मूळ रा. माणगांव,  ता. हातकणंगले, सध्या रा. हनुमाननगर)  यांना हे पाकीट सापडले. पाकिटात कागदपत्रे होती पण, त्यात कुठेही संपर्क नंबर नव्हता. त्यामुळे दोन दिवस असेच गेले. त्यानंतर त्यांनी पाकिटात असलेल्या एका खासगी लॅबच्या पावतीवरून त्या लॅबशी संपर्क साधून करले यांचा मोबाईल नंबर मिळवला. त्यावर संपर्क साधून करले यांच्या मित्रांसमोर पाकीट परत केले. त्यातील सर्व रक्कम, कागदपत्रे व्यवस्थित होती. करले यांनी त्यांना बक्षिसी घेण्यासाठी विनंती केली. त्यांनी ती नम्रपणे नाकारली. त्याच्या या कृतीमुळे जगात अजूनही प्रमाणिकपणा जिवंत आहे, हे दिसून आले. त्यांच्या या प्रामाणिकपणाला सलाम.