वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : श्री जोतिबा डोंगरवर गर्द घनदाट झाडी विखुरलेली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे, जातीचे साप, घोणस, नाग, फुरसे तसेच इतर विषारी-बिनविषारी साप पाहायला मिळतात. जोतिबा डोंगरवर कड्यालगत असलेल्या भागात ‘विटेकरी बोवा’ नावाचा दुर्मिळ जातीचा सर्प आढळला.

रात्री अकराच्या सुमारास हा साप वस्तीमध्ये जखमी अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी तात्काळ सर्पमित्र विक्रम चौगले यांना बोलवून घेतले. त्यांनी या सापाला पकडले. मांजराच्या हल्ल्यात हा साप जखमी झाला असल्याने त्याला वन्यजीव बचाव प्रमुख प्रदिप सुतार यांना संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले. पुढील उपचारासाठी वनविभागाचे वन्यजीव वैद्यकिय अधिकारी संतोष वाळवेकर यांच्याकडे पाठवले.

या कामी अमित कुंभार, सानिका सावंत, यश खबाले हे मदत करत आहेत. हा साप लांबून अजगराच्या पिल्ला सारखा भासतो चकचकीत नरम शरीर, मान शरीराच्या मानाने बारीक, शरीरावर काळपट तपकिरी किंवा गडद तपकिरी लहान-मोठ्या ठिपक्यांची नक्षी असते. लहान डोळे आणि उभी बाहुली, स्वभावाने मांडूळ प्रमाणेच शांत असतो. हा सर्प महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील पश्चिम घाट येथे आढळून येत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.