कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत गंगावेस ते पापाची तिकटी रस्त्यावर शिंदे गटाच्या स्वागत बूथसमोर महिला शिवसैनिकांकडे हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह ४० शिवसैनिकांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश माने, सोनू चौगुले यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

राज्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडून सत्तांतर झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीकास्र सुरू झाले. विविध मुद्यांवर रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधत आंदोलनही केले. दरम्यान सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत याच रागाचा प्रत्यय आला. रविकिरण इंगवले यांच्या फिरंगाई तरुण मंडळाची मिरवणूक क्षीरसागर यांनी स्वागत कक्षासमोर येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान, यावेळी इंगवले यांच्यासह ४० जणांनी महिला पदाधिकाऱ्यांकडे बघत हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविकिरण इंगवले यांच्यासह ४० जणांविरुद्ध विनयभंगाचा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.