कोल्हापूर (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन आणि नियमांत दिलेल्या शिथिलतेमुळे रविवारी रंकाळ्यावर लहान मुलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. दुपारपासून रंकाळ्यावर गर्दी वाढू लागली. सायंकाळनंतर गर्दीला ऊत येऊ लागला.   गर्दीला आवरताना पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. जणू काही कोरोना हद्दपार झाला या आर्विभावात नागरिक सर्व बंधने झुगारून रंकाळ्याची मस्त हवा खात फिरत होते.   

मास्क, सोशल डिस्टन्स याचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. लहान मुलांची मोठ्या संख्येने गर्दी होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठा धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जणू कोरोना संपला असे समजून पालकांनी लहान मुलांची कोणतीही काळजी न घेता रंकाळा सैर करण्यासाठी घेऊन आले होते. मुलांच्या तोंडाला मास्क नव्हता. सुरक्षित अंतराचे तर तीन तेरा वाजले होते. हजारोंच्या गर्दीपुढे बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांवर मोठाच ताण आला होता. त्यांची पूर्णपणे हतबलता यावेळी दिसून आली. शिट्टी वाजवून गर्दी हटविण्याचा ते केविलवाणी प्रयत्न करत होते.

नागरिकांनी देखील कोरोनाची भीती दूर सारून मोकळ्या वातावरणाचा आनंद घेताना  दिसत होते. खादय पदार्थांच्या गाडया हाऊसफुल्ल होऊन गेल्या होत्या. परंतु ही धोक्याची घंटा ठरू शकते. याचे गंभीर परिणाम पुढील काळात भोगावे लागू शकतात. निर्बंध शिथील केल्याने नागरिकांच्या स्वैर वृत्तीमुळे तिसऱ्या लाटेचे संकट लवकर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच  कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना डेल्टा प्लसचे ६ रुग्ण आढळले आहेत. शहरात सापडलेल्या तीन रुग्णांपैकी १ रुग्ण विचारे माळ येथील असून २ रुग्ण साने गुरुजी वसाहतींमधील आहेत. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दरम्यान, नागरिकांची रंकाळ्यावरील गर्दी नक्कीच चिंता वाढवणारी आहे. नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा एकदा भयंकर परिणामास सामोरे जावू लागू शकते.