रांगोळी (प्रतिनिधी) : काल (मंगळवार) रात्रीच्या सुमारास धरणगुत्ती रोडवर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिल्याने किशोर काटकर (रा. रांगोळी) या तरुणाचा मृत्यू झाला. किशोर रस्त्यावरती डोक्यावर आपटल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिक लोकांनी त्याला ॲम्बुलन्स मधून उपचारासाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

रांगोळी येथील किशोर काटकर कुरुंदवाड मधील सद्गुरू बाळुमामा ट्रॅक्टर शोरूम मध्ये विक्रीविपण्णन म्हणून काम करीत होता. मागच्या वर्षी मार्चमध्ये किशोरची आई अपघाताने मयत झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात आजीचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे किशोरचे अवघ्या तेवीसाव्या वर्षी लग्न करण्यात आले आणि लग्न होऊन एक महिना झाला नाही तोवर किशोरचा अपघाती मृत्यू झाला. यावेळी माजी आ. उल्हासदादा पाटील यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन किशोरला शिरोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.