कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोना आणि महापुरामुळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील रंगकर्मीवर उपासमारीची वेळ आली आहे. तर गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी असल्याने कलाकारांना कामच नसलल्यामुळे संसार चालवणे कठीण बनले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्रसह विविध सणसंभारभात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची परवानगी मिळावी यासाठी आज (मंगळवार) कोल्हापूरातील रंगकर्मींनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह वरीष्ठांशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शैलेश बलकवडे यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गेली तीन वर्षे कोल्हापुरातील कलाक्षेत्र बंद आहे. तर २०१९ ला कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे त्यावर्षी कोणताही सण किंवा उत्सव साजरा केला गेला नाही. त्यानंतर राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासनाने गेल्या दिड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून अनलाँक अंतर्गत काही घटकांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रंगकर्मी कोल्हापूर यांच्यावतीने राज्यात ९ ऑगष्टला आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु, सद्यस्थितीत कलाकारांना काम नसल्यामुळे कलाकार आर्थिक संकटात सापडला आहे. आता पुढे गणेशोत्सव, नवरात्र हे मोठे सण तोंडावर आहेत. त्यामुळे या सणांमध्ये कलाकार आपली कला सादर करून त्यांचा उदरनिर्वाह करू शकतो. तसेच येणाऱ्या उत्सवांमध्ये कलाकारांना छोटेखानी कार्यक्रम तसेच गणेशोत्सवामध्ये कलाकारांच्या  छोट्या नाटीका, गाणी, डान्स सादर करण्याची परवानगी मिळावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुखांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, मुकुंद सुतार यांच्यासह रंगकर्मी कोल्हापूरचे पदाधिकारी, कलाकार उपस्थित होते.