कोल्हापूर(प्रतिनिधी)  : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजाराची चर्चा रंगू लागली असतानाच सत्ताधारी महाविकास आघाडी अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे दिसून येत आहे. खुद्द शिवसेनेतील लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्प्ष्ट होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या नाराजीचा फायदा कोणाला मिळतो किंवा कोण उठवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नाराज सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप कोणती रणनीती आखतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे विजयाची माळ गळ्यात पडण्यासाठी भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना अजूनही संघर्ष करावा लागणार असे दिसते.मतदारसंघासाठी निधी मिळत नाही, अनेक विकासकामे मार्गी लागण्यातील अडथळे आणि दुसरीकडे आपल्याच मतदारसंघात विरोधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळणारे सर्व प्रकारचे बळ यामुळे शिवसेनेचे हे आमदार सत्ता येऊनही सध्या अस्वस्थ आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील शिवसेनेचे सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे महेश शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमांमधून आपली नाराजी अनेकदा प्रगट केलेली आहे. यातून मोठी खळबळही उडाली आहे. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असूनही हे सरकार आमचे वाटत नसल्याची भावना या आमदारांनी बोलून दाखवलेली आहे. यामध्ये आता खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या रूपाने तिसऱ्या आमदाराचे नाव जोडले गेले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची महाडिक हे तयारी सुरु करत असतानाच त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे सहावे उमेदवार म्हणून उतरविले आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याविरोधात लढवलेल्या पहिल्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना १४ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवलेल्या धनंजय महाडिक यांना चुरशीच्या लढतीत सध्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पराभूत केले होते.  पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला; पण उमेदवारी मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागला. ऐनवेळी पक्षाने उमेदवारीची माळ संभाजीराजे यांच्या गळ्यात घातल्यामुळे त्यांचा संघर्ष उमेदवारीच्या पातळीवरच संपला होता. २०१४ साली राष्ट्रवादीकडून लढताना प्रचंड संघर्ष केलेल्या महाडिक हे तेव्हा भाजपच्या मोदी लाटेत निवडून आले आणि खासदार झाले. पाच वर्षामध्ये त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला; मात्र २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळूनही मित्रपक्षांची साथ न मिळाल्याने त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता.

जिल्ह्याच्या राजकारणात सध्या बॅकफूट असलेल्या धनंजय महाडिक यांना राज्यसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास ती त्यांच्या दृष्टीने संजीवनी ठरू शकते. कारण महापालिका, गोकुळ, जिल्हा परिषदेतून महाडिक गट बाजूला फेकला गेला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत माजी आमदर अमल महाडिक व गोकुळमध्ये शौमिका महाडिक यांचा विजय आणि वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाडिक गटाला यश मिळाले असले तरी ते धनंजय महाडिक यांना आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी पुरेसे नाही. जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी राज्यसभा निवडणुकीतील विजय त्यांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाडिकांच्या विजयासाठी भाजपला जोरदार खेळी खेळावी लागणार आहे. दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठीनेही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. नेहमीच निवडणुकीतील यशासाठी संघर्ष करावा लागलेल्या धनंजय महाडिक यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यास त्यांचे दिल्लीत वजन वाढणार असून, त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत या विजयाचा फायदा होऊ शकतो.