कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी. याशिवाय तोडणी वाहतुकीमध्ये १४ टक्के करण्यात आलेल्या वाढीच्या बदल्यात हंगाम संपल्यानंतर २०० रुपये तातडीने द्यावेत. अन्यथा, साखरेचा एक कणही बाहेर सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते आज (सोमवार) जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये झालेल्या १९ व्या ऊस परिषदेत बोलत होते.

या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ‘मुख्यमंत्री नसताना जी मागणी केली ती मुख्यमंत्री असताना पूर्ण केली असती तर शेतकरी समाधानी झाला असता, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच ५ नोव्हेंबरला देशात किमान २ तास रस्ता रोको करणार, अशी घोषणाही त्यांनी केली.

ते म्हणाले की. संपूर्ण महाराष्ट्रातील एकही प्रदेश अतिवृष्टीतून सुटला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला शेतकरी जबाबदार आहे का ? जागतिक तापमान वाढीमुळे असे होत आहे, असे अभ्यासक सांगत आहेत. याला शेतकरी जबाबदार नसताना शेतकऱ्यांनीच का भोगायचे ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर जाऊन ठामपणे मागणी केली पाहिजे. जे पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत, त्यांच्याकडून निधी गोळा करून जे पर्यावरण संतुलनासाठी काम करतात, त्यांना द्यायला पाहिजे. ऊस तोडणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर काही नेत्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचा प्रश्न सोडविला. मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का कोणी पुढाकार घेत नाही ?, असा सवालही त्यांनी केला.