हातकणंगले सभापतीच्या निवडीला राजाराम कारखान्याच्या निवडणुकीची किनार..!

0
367

टोप (मिलिंद कुशिरे) :  हातकणंगले पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी मागील महिन्यांत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे  रिक्त झालेल्या सभापती पदी आज (शुक्रवार) निवड होत आहे. तरी सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच आगामी छत्रपती राजाराम साखर कारखान्याची निवडणूक लक्षात घेता  सभापती पदासाठी आ. विनय कोरे गटाचे प्रदिप पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

हातकणंगले पंचायत समिती सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. आवाडे, महाडिक, कोरे गटाचे सर्वाधिक सदस्य संख्या असल्याने पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती ही पदे या गटांमध्ये रोटेशन पध्दतीने देण्याचे ठरले आहे. त्यानुसार प्रथम सभापती होण्याची संधी भाजपला मिळाली.  दुसरी संधी जनसुराज्यला मिळाली, त्यानंतर सभापती पद ताराराणी आवाडे गटाकडे होते.

दरम्यान, आवाडे गटाचे महेश पाटील यांनी मागील महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी  माजी आमदार महादेवराव महाडिकांचे निकटवर्तीय  समजणारे भाजपचे सदस्य डॉ. सोनाली पाटील व उत्तम सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु, तोडांवर आलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विनय कोरे गटाचे टोपमधील सदस्य डॉ. प्रदीप पाटील यांचे नावे समोर आले आहे. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पालक मंत्री सतेज पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळेच महाडिकांनी आता पासूनच सावध पवित्रा घेतला आहे. या निवडणुकीत आ. कोरे आणि आ. प्रकाश आवाडे यांची मदत मोलाची ठरणार आहे. महाडिकांची जरी पाटील, सावंत यांना पसंती असली, तरी राजाराम  कारखान्यांवर वर्चस्व  कायम राखण्यासाठी आवाडे,  कोरे गटाकडे सभापतीपद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हातकणंगले तालुक्यात वारणा उद्योग समुहामुळे आ. विनय कोरे, तर सूतगिरणीमुळे आमदार प्रकाश आवाडे आणि  गोकुळमुळे  महाडिक गटाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, कारखान्यावरील सत्ता राखण्यासाठी महाडिक यांना सभापतीपद कोरे गटाला देणे फायद्याचे ठरणार आहे.  त्यामुळेच टोपचे प्रदिप पाटील यांच्या गळ्यात सभापती पदाची  माळ पडण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.  परिणामी  पाटील,  सावंत महाडिक यांचे निकटवर्तीय असले तरी तूर्तास त्यांना थांबावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी  दिसत आहे.