कोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी आज (शनिवार) आजन्म कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजीवकुमार सिंग (वय ३०, रा. हिस्सामुद्दीन, ता. रानीपूर, जि.आजमगड, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. यासाठी सरकारी वकील म्हणून सौ. अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

राजीवकुमार सिंग हा एका फरसाण कारखान्यामध्ये मँनेजर म्हणून काम करीत होता. तर पिडीत मुलगी ही त्याच कारखान्यात काम करत होती. दरम्यान, आरोपी राजीवकुमार सिंग याने पिडीत मुलीशी जवळीक वाढवून तिला अज्ञात ठिकाणी बोलावून एका खोलीमध्ये जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर पिडीत मुलीला आरोपीने गुजरातमधील सुरत येथे घेऊन जावून १९ दिवस एका खोलीमध्ये ठेवले होते.

याबाबत पिडीतेच्या आईने वडगांव पोलिस ठाण्यात मुलगी हरवली असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल टाँवरद्वारे पत्ता शोधून त्याठिकाणी जाऊन आरोपीला अटक करुन पिडीतेला ताब्यात घेतले. त्यामुळे राजीवकुमार विरुद्ध वडगांव पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याकामी विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. यामध्ये पिडीत मुलगी आणि इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकील कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तिवाद, दाखल केलेले उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचे निवाडे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी राजीवकुमार सिंगला आजन्म कारावासासह १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

यामध्ये सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांना अॅड. भारत शिंदे, अॅड. महेंद्र चव्हाण, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस अंमलदार मिलिंद टेळी यांचे सहकार्य लाभले.