कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती डोंगर (कर्नाटक) येथील श्री रेणुका देवीची यात्रा डिसेंबर महिन्यात आहे. या यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. या यात्रेकरिता २५ ते ३० वर्षे रेणुका भक्त एस. टी. ने जात आहेत. यात्रेकरिता शहरातून जवळपास २०० एस. टी. गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात. या गाड्यांचा खोळंबा आकार पूर्णपणे रद्द करावा आणि मागील चार वर्षात देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे विविध करांमध्ये कायमस्वरूपी विशेष सवलत द्यावी, या मागण्या राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचेकडे आज (बुधवार) निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मागील  चार वर्षात बसेसवरील खोळंबा आकार आणि गाडीभाडे यामध्ये भरघोस सवलत देण्यात आली आहे. यंदा कोरोनाचे संकट पाहता यात्रा होण्याचे निश्चित झाल्यास, सौंदत्ती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा, यासह चार वर्षात देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे विविध करांमध्ये कायमस्वरूपी विशेष सवलत द्यावी. सौंदत्ती यात्रेकरिता ही पंढरपूर यात्रेच्या धर्तीवर विशेष योजनेची निर्मिती करावी, कर्नाटकपेक्षा आपल्या एस. टी. चे दर कमी करावेत, परमिट फी कमी असावी, सेवा कर माफ करावा, यात्रेकरिता २०० गाड्या राखीव ठेवण्यात याव्यात, भाविकांना देण्यात येणाऱ्या गाड्या सुस्थितीत असाव्यात. यात्रा मार्गावर ब्रेकडाऊन गाड्याही उपलब्ध असाव्यात, याही मागण्या करण्यात आल्या आहेत.