कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची आणि कोणत्याही विद्यार्थी, पालकाची फसवणूक, लूट होणार नाही याची जबाबदारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची आहे. खासगी शाळांनी नियुक्त केलेल्या समितीवर संस्थाचालकांशी संबधित सदस्य असल्याने त्यांची मनमानी सुरू आहे. खाजगी शाळांच्या पीटीए समितीवर शासनाचे प्रतिनिधी नेमण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण उपसंचालक कार्यालयात आज (शनिवार)  बैठक पार पडली. क्षीरसागर म्हणाले की, प्रवेश प्रक्रिया विनाडोनेशन पार पाडावी. काही खाजगी शाळांचा मनमानी कारभार सुरूच आहे. कोरोनाच्या धर्तीवर ऑनलाईन शिक्षण देऊनही पालकांकडून आहे तेवढीच फी घेतली जाते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करून शाळांना फी कपातीचे निर्देश द्यावेत. खाजगी शाळांमध्ये नियुक्त असलेल्या पीटीए समितीवर शिक्षण संस्थेच्या मर्जीतील पालकांचा समावेश असल्याने खासगी शाळांचा मनमानी कारभार वाढला आहे. त्यामुळे पीटीए समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थेचे दोन प्रतिनिधी घेण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि शिक्षण मंत्री गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शालेय फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्याचे प्रकार घडू नयेत अशा सक्त सूचना शाळांना द्याव्यात. दरवर्षी प्रमाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत शिक्षण संस्थाचालकांची बैठक आयोजित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांनी, प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा, शासनाच्या निर्देशानुसार फी आकारणी आदीकरिता सर्व शिक्षण संस्थांची बैठक १४ जून रोजी आयोजित करण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे शालेय फी भरली नाही म्हणून यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवला जाणार नाही, असे स्पष्ट करीत कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली.

या वेळी एस.एस.सी.बोर्डचे कुणाल देविदास, प्रा.आय.जी.शेख, सहा. शिक्षण संचालक सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षणाधिकारी श्रीमती पूनम गुरव, शिक्षण उपनिरीक्षक डी.एस.पोवार, प्रशासन अधिकारी एस. के. यादव, योगेश चौगले, अॅड. चेतन शिंदे, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.