कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात घोटाळे झाल्याचे आरोप झाले आहेत. घरफाळा विभागाकडून नवीन इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता आणि घरफाळा लागू करण्याकरिता अवाजवी दंड आकाराला जात असल्याने घरफाळा आणि पूर्णत्वाच्या दाखल्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावण्यासाठी आणि घरफाळ्याबाबत तक्रारींच्या अनुषंगाने तत्काळ मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, घरफाळा दंड रकमेबाबत शासन निर्णयात सुधारणा करण्याकरिता प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या.

आज (शुक्रवार) घरफाळ्याची प्रलंबित प्रकरणे, नगररचना विभागाचे कामकाज याबाबत महानगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहरातील पूरग्रस्तांना भरपाई शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून पूरबाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून द्या, असे सांगून लाखो रुपयांचा घरफाळा बुडविणाऱ्या डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या सिद्धांत हॉस्पिटलवर दोन दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश क्षीरसागर यांनी यावेळी दिले. नगररचना विभागाने तत्काळ कामात सुधारणा करून लोकाभिमुख व्हावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले की, पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्याची पडताळणी पूर्ण केल्यानंतर त्वरित शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून पॉझीटिव्ह रेट दीड ते दोन टक्के इतका आहे. डेल्टा प्लस रुग्णांची संख्याही आवाक्यात आहे. घरफाळ्याच्या तक्रारींसदर्भात नागरिकांसाठी आठवड्यातील दोन दिवस ठरवून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.

या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, उपशहरप्रमुख सुनील जाधव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपायुक्त निखील मोरे, रविकांत आडसूळ, श्रीमती शिल्पा दरेकर, जल अभियंता अजय साळुंखे, घरफाळा अधीक्षक विजय वणकुद्रे, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत आदी अधिकारी उपस्थित होते.