के एम टी कर्मचारी संघटनेच्या वतीने राजेश क्षीरसागर यांचा सत्कार   

0
23

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही कर्मचाऱ्याना दिली होती. या पाठपुराव्यास यश प्राप्त होत असून, यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून के.एम.टी.च्या सुमारे ८०० कर्मचाऱ्याना वेतनवाढ देण्यात आली आहे. यासह रिक्त असणाऱ्या के.एम.टी. व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची रक्कम, ७ वा वेतन आयोग आणि रखडलेली पदोन्नती हे प्रश्न मार्गी लागले असून, आगामी काळात के.एम.टी.ला उर्जितावस्था देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे मान्य झालेल्या मागण्यांसाठी के.एम.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी, के.एम.टी. चे उत्पन वाढून के.एम.टी.सेवेस उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला जात असताना, कर्मचारी वर्गाच्या प्रश्ना संदर्भात गेल्या तीन -चार  महिन्यात महानगरपालिका प्रशासक यांच्यासोबत विविध बैठका पार पडल्या. या बैठकीत मनपा स्तरावरील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार यापूर्वीच के.एम.टी.च्या सुमारे ८०० कर्मचाऱ्यांना महागाई भत्तापोटी वेतनवाढ देण्यात आली आहे. यासह व्यवस्थापकांच्या रिक्त जागेवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने के.एम.टी.च्या व्यवस्थापनाच्या कामकाजात सुधारणा झालेली दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या उर्वरित प्रश्नासंदर्भात वारंवार महापालिका प्रशासनास सूचना दिल्या जात असून, त्यास पुन्हा यश आले आहे. कर्मचाऱ्याच्या थकीत वेतनासाठी रु.३० लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. ७ वा वेतन आयोग लागू करण्यासंबंधी ठराव करण्यात आला असून, को.म.न.पा.आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळताच ७ वा वेतन आयोग कर्मचाऱ्याना लागू होणार आहे. तसेच कर्मचाऱ्याची रखडलेली पदोन्नती प्रक्रिया मार्गस्थ झाली असून, याकामी आवश्यक रोस्टर तपासणी सुरु करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या या प्रश्नासह के.एम.टी.च्या उन्नतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आगामी काळात करणार असल्याचेही सांगितले.

यावेळी मान्यतप्राप्त संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक,  उपाध्यक्ष विश्वनाथ चौगले, जनरल सेक्रेटरी आनंदा आडके, खजाणीस अंकुश कांबळे, जॉ.सेक्रेटरी जितेंद्र संकपाळ, अभिजित रणनवरे, संघटनेचे सदस्य अश्विन चौगले, सागर वैराट, किरण सावर्डेकर, राजेश ठोंबरे, संभा निकम, दिलीप सुतार, रमेश चौगले,इ. उपस्थित होते.