कागल (प्रतिनिधी) : कागलच्या श्री लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपूल करण्यास आणि कागल बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेला पूल मोठा करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सातत्याने गडकरी यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.

कागल-सातारा सहापदरीकरण कामाच्या वेळी हा उड्डाणपूल बांधण्यात येईल. त्याचप्रमाणे कागल बसस्थानकानजीक असलेला पूल मोठा करण्यात येईल. या दोन्ही कामासाठीच्या खर्चाची तरतूद केली असल्याचे गडकरी यांनी घाटगे यांना पत्राद्वारे कळवले होते. याबद्दल घाटगे यांनी आज (बुधवार) दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले.

घाटगे यांनी सांगितले की, कागल जवळील लक्ष्मी टेकडीनजीक मार्गावर मोठी रहदारी असते. येथे अनेक वेळा अपघात होऊन कित्येकजण मृत्युमुखी पडले आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास अपघातांच्या प्रमाणात घट होईल. शिवाय वाहतूकही सुरळीत चालू राहील. त्यामुळे येथे उड्डाण पूल व्हावा व कागल बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेला अरुंद पूल यासाठी मी दोन वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. गडकरी यांनी या दोन्ही कामास मंजुरी देऊन त्याच्या खर्चाची तरतूद केली आहे. बऱ्याच दिवसांनी हा प्रश्न मार्गी लागल्याचे मोठे समाधान वाटत आहे.